Sunday, April 3, 2022
Bapu experience-imp
हा अनुभव वाचा खूपच सुंदर आहे. अंबज्ञ आहे.
हा बापू कोण आहे, एखाद्या गुंडासारखा दिसतो, तरीसुद्धा का एव्हढी माणसे त्यांना follow करतात. मी बापूला मानणारच नाही असे मनाशी पक्के ठरविले पण असे काय घडले कि हा बापू आता नुसता बापू नाही तर "देव" झाला. सद्गुरू कृपेने आलेला हा अनुभव....... हरी ओम, सर्वप्रथम मी बापूंचा फोटो माझ्या (बोऱ्हाडे) काकांच्या घरी साधारण २००१-२००२ साली पहिला. माझे काका बापूभक्त आहेत. तेव्हा फोटोकडे बघून असे वाटायचे कि हा माणूस नक्की कोण आहे ? अगदी एखाद्या बेवड्या सारखा दिसतो मग हि सर्व माणसे का ह्याची एवढी पूजा करतात. नंतर सूचित दादा, नंदाई आणि बापू ह्याचा फोटो काही गाड्यांवर बघितला. पण बापूंबद्दल माहिती अजिबात नव्हती. थोडे कुतूहल मनात होते पण त्याने काही विशेष फरक पडला नाही. साधारण २००५ साली माझ्या आईला डॉक्टर सामंत ह्यांनी बापूंबद्दल सांगितले, तेव्हा ती बापूंच्या प्रवचनाला गेली आणि तेथून आई, बापू आणि दादा ह्यांचा एक छोटा फोटो घरी घेऊन आली. मी ऑफिस मधून आलो आणि फोटो पाहिल्यावर तिला म्हणालो कि हा बाबा आपल्या घरात पण आला का ? तू कशाला ह्या बाबा लोकांच्या नादी लागतेस. आई म्हणाली कि तुला काय करायचे आहे, तुला पटत नसेल तर गप्प बस. ती पूजा वगैरे करायला लागली तेव्हा मी म्हणायचो कि ह्या सर्वांना वेड लागले आहे. याच दरम्यान ठाणे स्टेशन (पूर्व) जवळ बापूंचे उपासना केंद्र चालू झाले. आई तिथे जायला लागली, आता मी पण तिला घेऊन तिथे बाईक वर सोडत होतो, उपासना साधारण दीड तासाची होती आणि परत घरी या आणि परत तिला आणायला जा असे करण्यापेक्षा मीसुद्धा उपासनेला बसू लागलो. तेथे साधारण ५० लोक येत होते सगळेच बापूंच्या फोटोकडे पाहून पाया पडत होते, डोके ठेवत होते, त्यांची आरती करीत होते सगळेच नवल. मी हे पाहून मनात म्हणायचो कि ह्या सगळ्यांना वेड लागले आहे. सगळ्यांनीच कशी त्यांची बुद्धी गहाण ठेवली आहे. नंतर एकदा आम्ही काकांबरोबर बांद्राला प्रवचन स्थळी गेलो. तिथे गेट नंबर १ च्या समोर बसून राहिलो. बापू आले, त्यांचे ते हात हलवून सगळ्यांना प्रेमाने बघणे मनाला खूप भावले. बापूसमोर प्रदक्षिणा घातली, गर्दी खूप होती. मन आता एकदम कोरे झाले होते आणि शांतता लाभली. बापूंचे प्रवचन ऐकले, बापू एकदा म्हणाले होते कि लोक म्हणतात कि कृष्णाला सोळा सहस्र बायका होत्या इत्यादी इत्यादी. पण कृष्ण जेव्हा कंसाला मारायला गेला तेव्हा तो अवघा १४ वर्षाचा पण नव्हता. मग तो एवढ्या बायकांशी लग्न कसे बरे करेल. साधारण वैदिक पद्धतीने एक लग्न करायला किती वेळ लागतो गुणिले एव्हढी लग्न करायला किती वेळ लागेल, बापूंनी अगदी सर्वांना calculate करून दाखविले आणि करायला हि लावले. मग बापूंनी ह्या मागचे खरे कारण सांगितले. खरंच सांगतो माझ्या मनाला बापूंचे बोलणे खूप पटले कारण ते वास्तव होते. बापू कधीच मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाहीत, अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात समजून सांगतात. तेव्हा माझ्या मनात बापूंबद्दल आदर वाढला. पण प्रेम उत्पन्न नाही झाले. त्या दरम्यान बापुंची रामनाम बँक ची CD लावली होती. बापू म्हणाले कि मी एक बँक काढणार आहे. मी हळूच आईला म्हणालो कि आता हि सगळी लोक ह्याच्या बँकेत पैसे टाकतील आणि हा करोडो रुपये घेऊन भारतातून पळून जाईल. नंतर बापू म्हणाले कि हि जगातील एकमेव बँक आहे कि जिथे पैशाचा व्यवहार नसेल आणि बापूंनी सर्व काही explain केले. मला तेव्हा माझी स्वतःचीच लाज वाटली आणि मी जसा हा बापू समजतो आहे तसा हा बिलकुल नाही. हा इतर बाबा बुवांसारखा नक्कीच नाही. एक दिवस आई बांद्राला जायला निघाली मी पण तिच्या बरोबर गेलो आणि त्या दिवशी रामनाम वह्यांचे वाटप झाले, मी पण एवढ्या गर्दीत एक वही घेतली आणि ती घरी येऊन लिहायला चालू केली. चार दिवसात वही लिहून पूर्ण झाली पण ती कधी submit झाली नाही. पुढे २००६ साली माझे लग्न झाले, पत्नीचे Nursing चे शिक्षण पण नायर हॉस्पिटल मधून झालेले होते आणि बापूंचे MBBS, MD पण नायर हॉस्पिटल मधूनच झालेले. ती पण बापूंना ओळखत होती. तेव्हा तिचे सहकारी तिला बोलायचे कि बापू खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांची मेहनत, त्यांच्या बद्दल असलेला आदर इत्यादी हॉस्पिटल मधील गोष्टी तिने मला सांगितल्या होत्या. एकदा म्हणाली कि त्यांच्या senior staff वगैरे म्हणायच्या कि बापू देव आहे, ते मनातले पण सर्व जाणतात. मी म्हणालो या सर्वावर तुझे काय मत आहे तिने स्पष्ट शब्दात मला सांगितले कि ह्या सर्वांवर माझा अजिबात विश्वास नाही. मी सुद्धा तेच म्हणालो कि माझाही विश्वास नाही आणि विषय तिथेच संपला.
पुढे मी कधीच बापूंकडे प्रवचनाला गेलो नाही आणि कधी उपासना केंद्रातही गेलो नाही. साधारण दोन वर्षाचा काळ लोटला २००८ साल सरत होते. एकदा अचानक पहाटे एक तीन तोंड असलेला देव, पितांबर नेसलेले, एक हातात चक्र फिरत होते, एक हातात त्रिशूळ, एक हातात शंख, एक हातात कमळ, कमंडलू आणि एक हातात सोन्याची गदा आणि तीही किती लकलक करीत होती. तो एवढा मोठा आकाशा एवढा आणि मी एकदम छोटा. मी फक्त मान वर करून त्याच्याकडे नुसते पाहत होतो आणि तो हि स्मित हास्य करीत माझ्याकडे एकटक पाहत होता असे बऱ्याच वेळ चालले. कोणीच कोणाशी बोलत नाही फक्त एकमेकांकडे पाहणे. काही वेळाने मला खाली छोटी छोटी झाडे दिसली, एक मंदिर दिसले, त्या मंदिरात तीन देवी, समोर तुळशी वृन्दावन सारे काही मी पाहत उभा होतो. अचानक सगळं क्षणार्धात गायब झाले आणि बापू प्रत्यक्षपणे समोर आले आणि म्हणाले," बाळा बरेच दिवस झाले रे, तू माझ्या दर्शनाला नाही आलास लवकरात लवकर एकदा येऊन जा" आणि मी हो बापू म्हणत जागा झालो. सगळं डोळ्यासमोरून जात नव्हते, मी हिला झोपेतून उठवले आणि जे काही घडले, जे काही पहिले ते सर्व सांगितले. त्यावर ती म्हणाली कि तुम्हाला स्वप्न पडले असेल आपण कुठे बापूंना follow करतो. मी लगेच म्हणालो अग आपण follow करत असताना असे घडले असते तर गोष्ट वेगळी असती पण आपण बापूंना काहीच मानत नसताना हे सगळे कसे काय दिसू शकते. मी ऑफिसला आलो आणि लगेच माझा एक मित्र जो बापूंच्या प्रवचनस्थळी कार्यकर्ता होता (स्वप्नील चाळके) त्याला घडलेले सर्व काही सांगितले. तो म्हणाला कि बापूंनी तुला साक्षात दृष्टांत दिलेला आहे. मी म्हणालो मला ते काही सर्व कळत नाही पण मला आता तुझ्या बापूकडे घेऊन चल. मला त्यांना बघायची खूप ओढ लागली आहे. त्यावर तो म्हणाला कि बापू आता गुरुवारीच दिसतील आज तर सोमवार आहे. मी तुला येत्या गुरुवारी माझ्याबरोबर घेऊन जातो. त्याच दिवशी मला ५ वाजता आईचा फोन आला आणि ती मला म्हणाली कि तिचे काही काम आहे एक ठिकाणी, तू पण येतोस का माझ्याबरोबर. मी हो म्हटले आणि address लिहून घेत होतो. तितक्यात माझा दुसरा मित्र (सतीश गुरव) मला म्हणाला कि आरे हे ठिकाण तर माझ्या घराच्या जवळच आहे आणि आपल्या कंपनीची पनवेल बस तेथूनच जाते. मग आम्ही दोघे पनवेल बसमद्धे बसलो. मी नोकरी करत असलेली कंपनी रबाळे नवी मुंबई येथे आहे, त्याच दिवशी मी ठाण्याला राहत्या घरी यायच्या ऐवजी ऑफिस सुटल्यावर विरुद्ध दिशेने निघालो ! साधारण सायंकाळी सात वाजता आम्ही दोघे एका ठिकाणी उतरलो आणि गप्पा मारत चाललो. इतक्यात कशाचा काही संदर्भ नाही आणि माझा मित्र मला अचानक म्हणाला कि आकाशात बघ असे वाटते कि बापू तुझ्याकडे पाहून हसतात. मी वर पहिले आणि त्या दिवशी आकाशात चंद्रकोर आणि त्यावर बुध आणि शुक्र असे दोन ग्रह एक हसरा चेहरा होता हीसुद्धा एक ऐतिहासिक घटना होती. मी लगेच त्याला म्हणालो कि तू बापूंचे नाव का घेतलेस ? तू पण जास्त विश्वास ठेवत नाहीस आणि मी पण. मग असे का ? तो म्हणाला आरे असेच घेतले. मी म्हणालो असेच नाही यामागे नक्कीच काहीतरी आहे. त्यावर मी त्याला जे जे मी पहाटे पहिले होते ते ते सर्व काही सांगायला लागलो. आरे बापूंचे मंदिर आहे कुठेतरी, तेथे तुळशी वृन्दावन आहे, तीन देवी आहेत इत्यादी. ते सर्व त्याने ऐकले आणि तो म्हणाला कि तू खरंच सांगतोस ना ! मी लगेच म्हणालो कि माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वप्नीलला फोन लाव आणि विचार. त्याने चालता चालता मला थांबविले आणि म्हणाला तू मागे वळून बघ. मी म्हणालो," काय आहे मागे ?" त्यावर तो परत म्हणाला कि तू फक्त मागे फिरून बघ. मी मागे वळून पहिले तर माझा माझ्या डोळयांवर विश्वासच बसेना. समोर जुईनगरचे गुरुकुल, तेच तुळशी वृन्दावन, समोर तीन देवी, बाजूला छोटी छोटी झाडे, जे जे मी सकाळी स्वप्नात पाहिले ते सगळं संद्याकाळी माझ्या समोर जसेच्या तसे होते किंबहुना मी त्या ठिकाणी आपोआप जाऊन पोहचलो होतो. मी सतीशला सांगत होतो कि इथे एवढा मोठा देव आहे, बापू आहे सर्वकाही. त्याने लगेच स्वप्नीलला फोन लावला, स्वप्नील मला म्हणाला कि आरे तू तर ठाण्याला राहतोस ना मग आजच बापूंच्या जुईनगर येथील गुरुकुलला कसा काय जाऊन पोहचलास ! मला जुईनगरला बापूंचे असे काही गुरुकुल आहे ह्याची तिळमात्रही माहिती नव्हती. मी अगदी शांतपणे आत गेलो, बापूंच्या फोटोसमोर बसलो, कान पकडले आणि म्हणालो कि हे परमेश्वरा एवढे वर्ष तू मला बोलवत होतास पण मीच कधी ऐकले नाही, पण आज तू स्वतः मला कोण आहेस हे प्रत्यक्षपणे दाखविलेस आणि ह्या ठिकाणी घेऊनही आलास. आज ह्या क्षणापासून मी पूर्णपणे तुझा झालोय. माझ्यासाठी सगळं जग एका बाजूला आणि तू एका बाजूला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या काकांकडे गेलो आणि रामनाम वही मागितली. त्यांच्याकडे ती नव्हती, पण त्यांच्या ऑफिसच्या लॉकर मद्धे २ वह्या होत्या. मी त्यांच्याबरोबर त्यांच्या ऑफिस मद्धे गेलो आणि एक वही घेतली आणि लिहायला सुरुवात केली...... पुढे काही दिवसांनी बापूंचे घर शोधत खाररोड स्टेशन वरून चालत पुढे आलो, दुपारी आरती चालू होती. मी जसा जसा पुढे चालू लागलो तेव्हा पहिला फोटो पहिला तो दत्तात्रेय - दत्तगुरूंचा. तो बघताचक्षणी डोळ्यात पहिल्यांदा पाणी आले कारण जो देव मी माझ्या दृष्टांतात पहिला होता तो हाच होता. त्या क्षणापासून माझा बापूच माझ्यासाठी सर्व काही झाला होता. बापूला शिव्या घालणारा मी कधी बापू बापू करायला लागलो हे माझे मलाच कळले नाही. पुढे एक वर्षानंतर एकदा भारताबाहेर गेलो असताना माझ्या पत्नीने माझ्या नावाने एक साईसत्चरित्र ग्रंथ बापूंच्या सहीसाठी दिला होता. मी परत आल्यावर तिने मला हि गोष्ट सांगितली मी लगेच पुढील गुरुवारी त्या counter ला गेलो आणि ग्रंथ सही होऊन आला होता. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते, मी तो ग्रंथ माझ्या हृदयाशी घट्ट कवटाळला आणि बापूंनी कुठे सही केली ते शोधू लागलो. ते पण सापडले अध्याय १२ मधील ओवी १५३ ते १६६. एक डॉक्टर शिर्डीत जातात, ते म्हणतात साईबाबा मुसलमानाच्या पायी मी नमन करणार नाही. पण मला नमस्कार कर असे बाबा पण कधी बोलणार नाही असा विश्वास मामलतदार त्यांना देतात, मी साईबाबांना मानणारच नाही असे मनात शंका ठेवलेले डॉक्टर पुढे सर्वाबरोबर द्वारकामाईत येतात आणि काय नवल घडते कि नाही नाही म्हणणारे डॉक्टरच सर्वप्रथम बाबांच्या पुढे लोळण घालतात. हे पाहून सर्वांना नवल वाटते तेव्हा ते डॉक्टर म्हणतात कि रामरूप म्या देखील शामल, त्यांनी राम रूप पहिले आणि सगळा भ्रम मोडून काढला. जसा हा साई त्या रामरूपाने त्यांच्यासाठी त्यांचा देव झाला अगदी तसाच हा बापू माझ्यासाठी ह्या दत्त रूपाने माझ्यासाठी माझं सर्वस्व झाला !!!
अंबज्ञ. देवेंद्रसिंह डोंगरे. उपासना केंद्र - ठाणे
Subscribe to:
Posts (Atom)