Sunday, September 5, 2021

chimani ( sparrow)

हरि ॐ श्रीराम नाथसंविध्

चिमणीची कथा

सत्ययुगाच्या अगदी शेवटच्या वर्षांपर्यंतसुद्धा चिमणी हा पक्षी अस्तित्वातच आलेला नव्हता. इतर सर्व पशू, पक्षी, कीटक आदि सर्व योनी होत्याच. प्रत्येक कल्पातील, प्रत्येक महायुगातील, प्रत्येक सत्ययुगाच्या अगदी शेवटी शेवटीच चिमणी तयार केली जाते. अर्थात तिला वसुंधरेवर प्रकट केली जाते.
सत्ययुगाच्या अंतिम चरणामध्ये माता अनसूयेच्या आश्रमामध्ये देशविदेशीच्या संतांची, महामंडलेश्वरांची व ऋषिवरांची सभा भरली होती आणि चिमणीची निर्मिती करणे आवश्यक आहे असा विचार प्रत्येकजण मांडत होता.
ब्रम्हर्षि वसिष्ठांनी विचारले, हे माते अनसूये! आम्हा कोणालाही वसुंधरेच्या पाठीवर एकही अशी व्यक्ती आढळली नाही की जी पहिली चिमणी बनू शकेल.
माता अनसूया म्हणाली, हे ऋषिवरहो! अशी व्यक्ती तुम्हाला सापडली नाही तर चिमणी बनणारच नाही. मग त्रेतायुगाच्या ऐवजी कलियुगच सुरु होईल. त्यामुळे तुम्हाला अजून शोध घ्यायलाच हवा. माझा शब्द आहे - अशी व्यक्ती आहे. तुम्ही फक्त नीट शोध घ्यायला हवा.
माता अनसूयेच्या या आश्वासनामुळे उत्साहित होऊन त्याच रात्री ते सर्वजण आपापसांत चर्चा करु लागले. परंतु कुणालाही अशी व्यक्ती कुठेच दिसेना. अगदी अतिंद्रिय शक्ती व तपोबल वापरुनही ही व्यक्ती सापडत नाही हे लक्षात आल्यावर ब्रम्हवादिनी मैत्रेयी म्हणाली की ती व्यक्ती ज्ञानबल व तपोबल ह्यांच्या पलीकडे आहे.
ब्रम्हर्षि याज्ञवल्क्य म्हणाले, जेव्हा पवित्र व्यक्तीला ज्ञानबलाने व तपोबलाने शोधता येत नाही तेव्हा ती व्यक्ती ज्ञान व तप यांना बाजूला सारुन केवळ भक्तीमार्गाने पुढे गेली असली पाहिजे. तुम्ही सर्वजण धर्म नीट जाणणारे आहात. गुरुकुलांशी संबंधित असणा-या यज्ञशालांशी व मंदिरांशी निगडित असणाऱ्या व्यक्तींमध्येच शोध घेत आहात. तुम्ही अशा समाजाकडून उपेक्षित असणा-या सर्वसामान्य मानवाकडे वळा.
ब्रम्हर्षि याज्ञवल्क्यांच्या सल्ल्यानुसार सर्वजण विविध दिशांना विखुरले व नव्याने शोध घेऊ लागले.
ब्रम्हवादिनी मैत्रेयी शोध घेता घेता नर्मदा नदीच्या तीरावर येऊन पोहोचली. तेथे तिला एक आदिवासींचा जत्था प्रवास करताना दिसला. त्या जत्थ्याच्या मधोमध एक अत्यंत जख्ख वृद्ध स्त्री चालत होती. त्या जत्थ्यातील सर्वजण तिच्याशी अत्यंत प्रेमाने व विनयाने वागत होते. रात्र होताच त्या जत्थ्याने विश्रांती घेण्यासाठी स्थान निवडले. त्या जत्थ्यातील काहीजणांनी ही कुणीतरी ऋषि स्त्री आहे व एकटी आहे असे जाणून त्यांच्याबरोबर येण्याचे आमंत्रण दिले.
ब्रम्हवादिनी मैत्रेयी सहजपणे त्यांच्या जत्थ्यात सामील झाली. रात्रीचे भोजन चालू असताना तिला कळून आले की हा संपूर्ण जत्थ्या म्हणजे या प्रमुख वृद्ध स्त्री चे कुटुंबच आहे. पुत्र, कन्या, जामात, स्नुषा, नातू, पणतू, खापरपणतूही जत्थ्यात सामील आहेत आणि त्या वृद्ध स्त्रीचे प्रत्येकावर समानपणे प्रेम आहे. कुणाचीही आपापसांत भांडणे झाली तर ही वृद्ध स्त्री अशा रीतीने न्याय करत होती की कुणाचीही हानी होऊ नये.
रात्री इतर सर्वजण झोपी गेल्यावर  मैत्रेयी त्या वृद्ध स्त्रीजवळ गेली व म्हणाली, तू ह्या प्रत्येकामधील भांडणे कशी चांगल्या रितीने सोडवतेस? हे कसे जमते?
ती वृद्ध स्त्री म्हणाली, मला काय कळते. मनात येईल ते बोलते. बस्स.
मैत्रेयीने विचारले, ह्या सर्वांचे तुझ्यावर एवढे अपरंपार प्रेम कसे? त्यांच्याकडे एवढी आज्ञाधारकता कशी?
ती म्हणाली त्यांचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून ते माझं ऐकतात. त्यात माझं काय?
मैत्रेयीने विचारले, तुमचा जत्थ्या कुठे चालला आहे? तुझ्या सांगण्यावरूनच ते दिशा बदलतात हे मी दिवसभर पाहिले आहे.
ती वृद्ध स्त्री म्हणाली, नक्की कुठे जायचे आहे हे मलाही माहित नाही. पण आमच्या जुन्या जागी खोटे बोलणा-या लोकांची संख्या वाढू लागली म्हणून आम्ही तो प्रदेश सोडून निघालो आहोत. जेथे सुपीक प्रदेश असेल तेथे आम्ही नवीन वस्ती वसवू. मात्र जवळपासचे लोक प्रेम करणारे असावेत.
माझ्या आधीच्या सहा पिढ्या आणि माझ्यासकटच्या पुढच्या सात पिढ्या मी नीट पाहिल्या आहेत. त्यातून मी एकच शिकले - जेथे खरे प्रेम असते तेथे खोटेपणा येत नाही आणि काही खोटे असलेच तरी प्रेमाने ते धुतले जाते.
ह्या गोष्टीसाठी मला एकही अपवाद सापडला नाही आणि म्हणून मी प्रेमच करीत राहते. बाकी मला काही माहितच नाही आणि जमतही नाही.
ब्रम्हवादिनी मैत्रेयीने अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने विचारले, तू सर्वांत जास्त प्रेम कोणावर करतेस? तुला प्रेम कुणी शिकवलं?
त्या वृद्ध स्त्रीने दोन्ही हात जोडून व डोळे बंद करून उत्तर दिले, माझ्या आधीच्या सहा पिढ्यांनी मला सांगितले होते की सगळ्यात मोठा देव आकाशात राहतो आणि तोच आकाश असतो आणि तोच आपल्यावर खरेखुरे प्रेम करतो आणि हे प्रेम मी अनुभवले आहे आणि अनुभवत आहे.
हे आकाश ना, आपल्यावर खूप प्रेम करते. इतर सर्व गोष्टी कधी असतात, कधी नसतात. पण आकाश मात्र आपल्या डोक्यावर आणि आपल्याबरोबर सदैव असतेच. अर्थात तो देवाधिदेव माझ्या डोक्यावर आणि माझ्या बरोबर असतोच आणि तेसुद्धा कसे? तर आपल्याला जाणीव सुद्धा न देता. इतका तो चांगला आहे गं!
त्याच क्षणाला आकाशातून स्वयंभगवान पुरुष रुपाने प्रकटला आणि त्याने त्या वृद्ध स्त्रीला आपल्या तळहातावर घेतले आणि या महायुगातील पहिली चिमणी तयार झाली.
आणि तो जत्थाच क्रमाक्रमाने चिमणी वंशाचा विस्तार झाला.

विस्तारित माहितीसाठी तुलसीपत्र १६२४ वाचावे
अंबज्ञ

No comments:

Post a Comment