Sunday, September 5, 2021

Gurushetram mantra

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८.०३.२०१३)
॥ हरि  ॐ॥
 

ॐ रामप्राण श्रीहनुमंताय नम:। हनुमन्त म्हटला की अनेक गोष्टी आठवतात. अगदी लहान मुलांनासुद्धा हनुमंताच्या, गणपती बाप्पाच्या गोष्टी आवडतात. आपण म्हणतो की हा एकदा बोलायला लागला की बोलतच राहतो, हनुमंताच्या शेपटीसारखा. हनुमंताची शेपटी वाढतच राहते म्हणून आपण वाढणार्‍या गोष्टींना हनुमंताची शेपटी म्हणतो. रामदास स्वामी म्हणतात की, ‘ब्रह्माण्डाभोवते वेढे वज्र पुच्छे करू शके।’ ह्याच्या शेपटीचे शेवटचे टोक वज्र आहे. त्या शेवटच्या टोकानेसुद्धा तो अख्ख्या ब्रह्माण्डाभोवती वेढे घालू शकतो.

प्रत्येक गावोगावी, सीमेवर, झाडाखाली स्थापन केलेला आपण बघतो, त्याची स्तोत्रं आहेत, रामायणात एवढे हनुमंताला महत्त्व असूनही आपण कधीही त्याला प्रमुख देवता मानला नाही. लक्ष्मी पाहिजे असते कारण सुबत्ता हवी असते, गणपती पाहिजे कारण तो विघ्ननाशक आहे, सत्यनारायण केला की संकट टळतं पण हनुमन्ताविषयी अशी कुठलीच कथा नाही मिळत. प्रत्येक देवाच्या चरित्रात त्याचे भक्त असतात साईनाथांचे भक्त आहेत, रामाचे भक्त आहेत पण हनुमंताच्या चरित्रात त्याचा भक्त दिसत नाही. साडेसाती आली की आम्हाला हनुमंत आठवतो. मग प्रत्येक ठिकाणी देवळे बांधावीत एवढे ह्याचे काय महात्म्य आहे? हनुमंताचे भक्त कोण आहेत? - राम, सीता, लक्ष्मण, सुग्रीव, अंगद, बिभीषण हा हनुमंताचा भक्तही आहे आणि शिष्यही आहे, बेसिकली सगळे वानरसैनिक हनुमंताच्या सांगण्यावरून येतात. 

आम्ही नेहमी झडपा लावून बघत असतो. फोडणीचा भात हा शिळ्या भाताचाच का करायचा? आम्हाला परंपरेने माहीत असतं, आम्ही त्यातून बाहेर पडतच नाही. आम्ही स्वत:च्या मनामध्ये इमेज तयार करून ठेवतो त्याच्या पलीकडे कधी जात नाही. हनुमंता रामाचा दास आहे आणि तो जे काही करतो ते रामासाठी करतो हे एवढंच आम्हाला माहीत असतं.

‘कुमति निवार सुमति के संगी।’ ‘नासै रोग हरै सब पीरा।’ ‘संकट तें हनुमान छुडावै ।’ ‘राम रसायन तुम्हरे पासा।’ ‘दुर्गम काज जगत के जेते।’ - ह्याचे दोन अर्थ होतात - १) जग जिंकण्यासाठी जे दुर्गम आहे ते तुझ्यामुळे पार पडते. २) तू स्वत:च सर्व विश्वात जे जे दुर्गम आहे त्यावर विजय मिळवून ठेवला आहेस, त्यामुळे तुझा अनुग्रह सगळं काही सुगम करतो. एवढी वाक्यं बोलतो पण लक्षात कोण घेतो. हनुमानचलिसामुळे हनुमान आपल्याला समजतो, जवळचा वाटतो. 

हनुमंत म्हणजे महाप्राण. अजीवांची जसं आहे तसं ठेवण्याची शक्ती आणि सजीवांमधली विकास करण्याची शक्ती हा महाप्राण करतो. तो अतिशय विराट आहे. 

केळीच्या फुलातून एकदा केळ प्रसवली की परत तिला त्यातून फळ येत नाही. काही झाडांचे परागकण वार्‍यावर उडतात आणि त्यांची झाडे तयार होतात. आंबा, फणस ह्यांना फळं किती वर्षांनी लागतात. आपण उत्क्रांतीवाद शिकतो एक पेशीय प्राणी ते माणूस ह्याला उत्क्रांतीवाद म्हणतात. आधीसुद्धा वेगवेगळ्या वनस्पती अस्तित्वात होत्या आणि आजही वेगवेगळ्या वनस्पती अस्तित्वात आहेत. 

समजा तुमच्यासमोर २० वेगवेगळी दिसणारी माणसं उभी केलीत, ज्यांना तुम्ही पहिल्यांदा बघताय, त्यांना तुम्ही वेगवेगळे ओळखू शकाल का? हो, आता समजा २० म्हशी समोर उभ्या केल्या तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या ओळखू शकाल काय? नाही, का नाही त्यांच्यामध्येही फरक असतो. माणसं आणि म्हशी पहिल्यांदा बघता पण माणसं ओळखू शकता आणि म्हशी ओळखू शकत नाही असं का? पण म्हशीच्या मालकाला प्रत्येक म्हैस वेगळी दिसते. माणसाला माणसांचे वेगळेपण कळते पण म्हशींचे कळू शकत नाही. पण म्हशी पाळणार्‍याला कळते. त्या कळपात बाहेरून घुसलेली म्हैस त्याच्या लक्षात येते त्याचप्रमाणे त्याच्या म्हशींमधली चोरीला गेलेली म्हैस त्याच्या बरोबर लक्षात येते. 

प्रत्येक मनुष्याला स्थूल पातळीवर दोन गोष्टींमधली तुलना व फरक आपोआप कळत असतो. ती शक्ती प्रत्येक मनुष्याला जन्मत:च प्राप्त असते. मनुष्याच्या मनात निरीक्षण होते तशीच तुलना आपोआप होते. दोन वस्तू बघितल्यावर त्यामध्ये फरक काय? ही शक्ती महाप्राणामुळे असते. power of selection म्हणजे निवडण्याची शक्ती आणि power of dinstinguish म्हणजे भेद ओळखण्याची शक्ती मनुष्याकडे महाप्राणाकडून येते. ही प्रत्येकाला समानतेने मिळालेली असते व ती शक्ती मनुष्याने वाढवत न्यायची असते. प्रत्येकजण ज्या ज्या विषयात गती करतो त्या त्या विषयात त्याच्या ह्या दोन गोष्टी अधिक प्रगल्भ होत जातात. प्रत्येक माणसात ह्या दोन शक्ती आहेत. दोन वस्तूंमधला, प्राण्यांमधला फरक ओळखणं आणि त्यातून निवडणं हे महाप्राणाकडून मिळत असतं.

वनस्पतीची पानं दिवसा कार्बनडायऑक्साइड आत आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. रात्री ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बनडायऑक्साइड बाहेर टाकतात. त्यापासून पाने अन्न तयार करतात. आपल्या शरीरातले रक्त ऑक्सिजन खेचून घेतो आणि कार्बनडायऑक्साइड फेकले जाते हा choice आहे. आपण अवधूत चिंतन उत्सवात ग्राह्य काय आणि त्याज्य काय हे शिकलोत. ग्राह्य काय आणि त्याज्य काय ह्यासाठी दत्तात्रेय आपल्याला मदत करतो. हनुमन्त म्हणजेच दत्तात्रेय जेष्ठ चण्डिकापुत्र आणि दत्तात्रेय म्हणजेच हनुमन्त. 

ग्राह्य काय आणि ग्राह्य हे तो एकच जेष्ठ चण्डिकापुत्र दत्तात्रेयरूपाने शिकवतो, देतो, देत राहतो. ग्राह्य म्हणजे घ्यायचं काय? त्याज्य म्हणजे टाकायचं काय आहे? हे शिकवतो.  

हनुमंताच्या रूपाने choice करायला मनुष्याला शिकवतो. पण मनुष्य नेमकं नको ते ठेवतो आणि पाहिजे ते त्याज्य करतो. म्हणून हनुमंत आवश्यक आहे. ‘कुमति निवार सुमति के संगी।’ choice करणं ह्यातच माणसाचे problem होतात त्यासाठी आवश्यकता असते सुमतीची. आमचा choice correct यायचा असेल तर आमच्याकडे सुमती असायला हवी.

आमच्याकडे हनुमंताची कृपा असावी लागते. आम्हाला ग्राह्य काय? त्याज्य काय? माहीत असतं तरी आपण हट्टीपणाने पुढे जात असतो. कारण आम्ही हनुमंताला विसरतो. म्हणून आमच्याकडे चण्डिकाकुल आहे तर आमचे पाय जमिनीवर राहतात.

मुलांना ४० टक्के मिळाले तरी आईवडिलांचा आग्रह असतो दादांकडे की मुलांना engineer बनवायचे का? ज्या विषयात प्राविण्य आहे त्या विषयात पुढे जायला द्या. मुलांना engineer, doctor, मेडिकलमध्ये अ‍ॅडमिशन मिळाली की ग्रेट हे आईवडिलांच थोतांड आहे. प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे, हे प्रत्येकाचं सगळं वेगळं महाप्राणामुळे आहे. काही वेळा एकाच बिजाचे दोन भाग होऊन जुळी मुलं तयार होतात, दिसायला ती सारखी असतात पण त्यांची प्रत्येक गोष्ट वेगळी असते. हा भेद maintain करतो तो हनुमन्त. मुलांनी commerce घेतलं की त्याने CA झालंच पाहिजे. नापास झाले की आईवडिल मुलांना, देवाला शिव्या घालतात आणि मुलं आईवडिलांना शिव्या घालतात. कुठलंही क्षेत्र कमी नाही. सगळे civil engg., electronics engg., computer engg., झालेत, अमेरिकेला मुलांना पाठवलेच पाहिजे. अशा लाटा येतात नि जातात. कुठलंही क्षेत्र कमी महत्त्वाचं आहे आणि जास्त महत्त्वाचं आहे लोक म्हणतात म्हणून ठरवू नका.

भलेभले लोकसुद्धा नको त्या scheme मध्ये पैसे गुंतवतात नि आपटतात. बापूला काय कळते? असं बोलणारे आज इथे बसले आहेत ग्राऊंडमध्येच. एकाने पैसे गुंतवले पहिल्यांदा फायदा झाला. मनात बापूला काय कळते म्हणून बापूंचा उद्धार केला. पुढे VRS घेतल्यावर ४५ लाखांचे नुकसान झाले. आज एक-दीड वर्ष झाले, तरीही पैसे परत नाही. ते सदगृहस्थ मग आत्महत्या करायला निघालेत, पण तो जोपर्यंत तुमच्या चेकवर सही करत नाही तोपर्यंत तुम्ही चौथ्या मजल्यावरून जरी उडी मारलीत तरी तुम्हाला काय होणार नाही आणि त्याने सही केली की तुम्ही घरात कितीही safety करून बसलात तरी तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही.

हनुमन्त काय आहे ‘कुमति निवार सुमति के संगी’ म्हणजे दुर्बुद्धी नको. आम्हाला माहीत पाहिजे choice म्हणजे selection करण्याची शक्ती हनुमंत देतो. काही जणांना सवय असते दिवसभर प्रत्येक देवाला नमस्कार करायची. का? तर देव कोपेल म्हणून घाबरून ही मंडळी देवाला सारखा नमस्कार करत असतात. देवाला काय दुसरी कामे नाहीत? जी हे विश्व निर्माण करते तिचे तिन्ही पुत्र तिच्या आज्ञेतच असतात. तुमच्यावर कोप करण्यासाठी तुम्ही एवढे काय वाईट आहात? देवाला काय तुमच्यावर कोपल्याशिवाय धंदाच नाही काय? मध्यंतरी संतोषीमाता फेमस झाली होती पिक्चरमुळे. पिक्चर निघायच्या आधी तिचं नावं तरी माहीत होतं का कोणाला? हे सगळे देवांचे स्तोम वाढवणे, कमी करणे हे ढोंगी लोक करत असतात. कोणीतरी चत्मकार करतं म्हणून त्याच्यामागे सगळे धावतात. मोठमोठे मॅजिशियन अनेक जादू करतात गोष्टी निर्माण करतात, आयफेल टॉवर नाहीसा करून दाखवतात. ते मान्य करतात की ही त्यांची हातचलाखी आहे आणि काही जण अंगाला राख फासून, अंगरखा घालून बुवा बनतात आणि ह्याचा बाजार मांडतात. 

अशा गोष्टी चण्डिकाकुल करत नाही. ते तुमच्या जीवनात चमत्कार घडवून आणतात पण त्याचं प्रदर्शन मांडत नाही, त्याचं कधीही स्तोम माजवत नाहीत. निवडीचं स्वातंत्र्य आमच्याकडे आहे. देवळात बसलेला हनुमंत आम्हाला आमचा वाटला पाहिजे.जे चण्डिकेकडे आहे तेच तिच्या पुत्रांकडे असतं, आडात असेल तेच पोहर्‍यात येणार. विहिरीत पाणी आहे तर तुमच्या मडक्यात पाणीच येणार, विहिरीत मध आहे तर तुमच्या मडक्यात विष येणार नाही.

आम्ही गुरुक्षेत्रम् मंत्र म्हणतो म्हणून आम्हाला खात्री आहे की ‘सर्वकोपप्रशमनं श्रीगुरुक्षेत्रम्’ चण्डिकाकुल कधीही मानवांवर कोपत नाही, तर असुरांवर कोपते. हे आम्हाला केव्हा कळेल जेव्हा आम्ही हनुमंताचा हात धरू तेव्हाच. हनुमंत म्हणजेच ‘बुद्धिमतां वरिष्ठम्’ सगळे बुद्धिवान एकत्र केलेत तरी त्याहून तो वरिष्ठ आहे. हनुमंताची उपासना आयुष्यात नित्य असणे आवश्यक आहे. हनुमंताचे अस्तित्व तुमच्या जीवनात असणं, तुम्ही त्याला जीवनात आणणं आवश्यक आहे. तुमची निवड चुकू नये म्हणून हनुमंत ताकद देत असतो. ती मजबूत करण्याची तयारी हवी. 

Business करणं म्हणजे खायाची गोष्ट नाहीय. मित्राचा business चांगला चाललाय म्हणून त्याच्याशी गप्पा मारून business येत नाही. मोठमोठे businessman आपल्या मुलांना आधी दुसर्‍या businessman कडे कामाला ठेवतात. उद्योगपतीसुद्धा त्यांच्या मुलांना लहानपणापासून दुसर्‍यांच्या दुकानावर काम करायला शिकवतात, त्यांना नोकर म्हणून ठेवतात आणि नोकर मंडळींपेक्षा ही माणसं जास्त धावपळ करत असतात. मग ते businessman बनतात. Choice करताना कुठल्याही क्षेत्राला दुय्यम लेखू नका. प्रत्येक क्षेत्र चांगलं आहे. शिक्षण व व्यवसायाच्या बाबतीतसुद्धा आपल्याला नीट choice करता येण्यासाठी हनुमंताची कृपा आमच्या आयुष्यात हवी. Choice नीट करता यावा म्हणून हनुमंताची नितांत आवश्यकता आहे.

आधी माहिती करण्याचे श्रम घेतले पाहिजेत मग बदल करावे लागतात. Choice करण्याची क्षमता आमच्यात असते. पौरससिंहने बारावीला maths च्या ऐवजी psychology विषय घेतला. त्यामुळे त्याला तीन मुख्य विषयांकडे लक्ष देणे सोपे झाले.

मुले जेव्हा हनुमानचलीसा म्हणतात तेव्हा तुम्ही टीव्ही बघत बसता. मुलांनी आईवडिलांच ऐकणं आवश्यक आहे तसंच आईवडिलांनीही मुलांच्या भावना समजून घेणं आवश्यक आहे. मुलं हनुमानचलीसा म्हणतात आणि आईवडील सिरिअल्स बघत असतात म्हणजे मुलांना वाटतं की हनुमानचलीसा दुय्यम महत्त्वाची आहे आणि टीव्हीच्या सिरिअल्स महत्त्वाच्या आहेत.

संस्कार करणं म्हणजे हनुमानचलीसा म्हण असं सांगणं नाही तर हनुमानचलीसाचा आदर स्वत:आईवडीलांनी राखला पाहिजे. 

‘जय हनुमान महाप्रभु । सखा बंधु स्वामी ।’ ह्या आरतीत आपण बघतो तो सखा आहे, बंधु आहे आणि स्वामीपण आहे. ‘नूतन पथ अधिनायक’ प्रत्येक नवीन दरवाजे तो उघडून देतो. नसतील तर नवीन दरवाजे चण्डिकाकुल तयार करून देतात, जेव्हा तुम्हाला वाटतं काही मार्ग उरलेला नाही तेव्हा मनमोकळेपणाने त्याला हाक मारा पण ती वेळ येईपर्यंत थांबता का? जोपर्यंत चांगलं आहे तेव्हाच त्याला हाक मारायची. मुलगा दहावीत जाईपर्यंत आम्ही थांबू मग हनुमानचलीसा म्हणू असे करू नका. पुढे होणार्‍या सासवांनी हनुमानचलीसा म्हणा सून चांगली मिळावी म्हणून आणि मुलींनी ज्या सुना होणार आहेत त्यांनी चांगली सासू मिळावी म्हणून हनुमानचलीसा म्हणा. हनुमंत Choice करण्याचं सामर्थ्य देतो. शब्द निवडण्याचा सुद्धा आपला Choice चुकतो. भांडतानासुद्धा आपण चुकीचा शब्द निवडतो आणि समोरच्या माणसाच्या काळजावर तो वार करतो. हा चॉईससुद्धा चण्डिकाकुल बदलतो. 

राम म्हणजे निष्कलंक आनंद. निष्कलंक आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा चॉईस परफेक्ट असतो तेव्हाच भक्ती, शेजार, मित्र यांची उचित निवड होते.

‘ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:।’ ह्या मंत्रात, अश्वत्थ मारुती पूजनात ही ताकद आहे. आज आम्ही आठ वर्षाचे असू, ऐंशी वर्षाचे असू आजपासून ज्यांना असं वाटतं आमचं जीवन right असावं, wrong असू नये, त्यांनी आपआपल्या परीने हनुमंताची उपासना करा, त्याचं भजन करा. प्रत्येक पातळीवर निवडच, correction हा महाप्राण हनुमंत करत असतो. म्हणून आपण म्हणतो - ‘ॐ रामात्मा श्रीदत्तात्रेयाय नम:’ आणि ‘ॐ रामप्राण श्रीहनुमन्ताय नम:’

॥ हरि ॐ॥    
अंबज्ञ
🙏🏼❤️❤️🙏🏼

Source: aniruddhabapu.in

No comments:

Post a Comment