From whatsApp message in group
हरि ओम
आज १४ जून , सदगुरु डॉक्टर अनिरुध्दसिंह धैर्यधर जोशी म्हणजेच आपले सर्वांचे अत्यंत लाडके परमपूज्य बापू ह्यांचे मानवी सदगुरु श्री गोपीनाथशास्त्री पाध्ये ह्यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म १४ जून १८६४ ह्या दिवशी झाला होता.
श्री गोपीनाथ पाध्ये ह्यांच्या घराण्यात भक्तीची बीजे रोवली गेलीच होती. ह्यांचे वडील श्री जगन्नाथ पाध्ये हे अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थांच्या चरणी भक्तीत तल्लीन झाले होते. गोपीनाथ पाध्ये अगदी लहानपणापासून आपल्या वडीलांसोबत स्वामींच्या दर्शनाला जात असत. स्वामींच्या निर्याणाआधी असेच एका भेटीत जगन्नाथ पाध्येंनी आता आपली भेट व दर्शन पुन्हा कधी होणार असे सहज विचारले असताना स्वामींनी आता आपण ह्यापुढे शिरडीला भेटू असे उद्गार काढले होते. त्यानंतर जगन्नाथ पाध्येंनी स्वामींच्या महानिर्याणानंतर ह्या अनंताला सगुण साकार रूपात शोधण्याच बराच प्रयत्न केला होता. पुढे आपल्या वडीलांच्य्य निधनानंतर श्री गोपीनाथ पाध्ये ह्यांनी बराच काळ शोध घेतला होता. त्यावेळी शिरडी हे गाव प्रसिध्दीस आले नव्हते . त्यामुळे पाध्येंना शिरडीचा आणि स्वामींचा शोध लागत नव्हता. तेव्हा एकदा त्यांचे नातेवाईक श्री भगवानराव कुलकर्णी ह्याच्यांकडून त्यांना शिरडीला साईबाबा म्हणून एक महान अवलिया वास्तव्य करून असल्याची बातमी कळली. अर्थातच श्री गोपीनाथ पाध्येंनी तातडीने शिरडीला धांव घेतली. पण तेथे गेल्यावर लक्षांत आले की साईबाबा तर मशिदीत राहतात , कोणी त्यांना मुसलमान म्हणे, तर कोणी भिक्षा मागणारा वेडा फकीर ! स्वामी भेटीची आर्त मनी दाटली होती आणि मन कासावीस झाले होते , पण दुसरीकडे पाय़ मागे खेचले जात होते. शेवटी सदगुरुंच्या भेटीच्या ओढीने आणि स्वामींच्या शब्दांचे स्मरण ठेवून मनाचा हिय्या करून गोपीनाथजी मशीदीत गेले आणि साईबाबांच्या चरणीं मस्तक ठेवतांच स्वामींच्या शब्दांची खूण पटली ती साईबाबांच्या मुखातील पहिल्या बोलानेच " आता तरी खूण पटली ना ! " त्या क्षणी माझा सदगुरु ( स्वामी समर्थ ) मला भेटला ही मनाची गांठ दृढ बांधली गेली ती कायमचीच. पुढे अनेक वेळा समाजात त्यांना अनेक व्यक्तींनी , त्यांच्या नातेवाईकांनी साईबाबा मुसलमान आहेत, ते कफनी घालतात, मशीदीत राहतात, भिक्षा मागतात , दक्षिणा घेतात म्हणून त्रास दिला आणि साईबाबांपासून दूर करायचा प्रयत्न केला. पण गोपीनाथजी अढळ होते "शेंडी तुटो वा पारंबी " "तो" माझा गुरु आहे, माझा सदगुरु आहे ह्या मतावर ते अढळ होते.
पुंडलिक म्हणजे भक्तीमार्गाचा अग्रणीच ! पंढरपूरच्या विठू माऊलीच्या भक्तीची गोडी ज्याने केवळ वारकरी संप्रदायातच नव्हे तर अवघ्या जनमानसांत रूजविली तो पुंडलिक म्हणजे विठोबाचा अनन्य भक्तच !सावळे परब्रम्ह बालरूपात धावून आल्यावर पंढरीच्या चंद्रभागेच्या तटी भक्तीच्या वीटेवर विसावयाला ज्याने आपल्या भक्तीची मेख मारून अठ्ठावीस युगे अढळ केले तो हा महान भक्त !
आपण सारे ही कथा जाणतो की पुंडलिकाला भेटायला पूर्णावतार योगेश्वर जगद्गुरु श्रीकृष्ण आठ वर्षाच्या बाळरुपात धावत धावत पंढरपूरला आले आणि त्याने फेकलेल्या विटेवर, कमरेवर हात धरुन वाट पहात उभे राहिले. पंढरीत विटेवर हा स्थिर झालेला पुतळा अठ्ठावीस युगे झाली तरी तसाच उभा होता. कालांतराने ह्याच भक्तीच्या मार्गावर पुन्हा एक तसाच जबरदस्त ताकतीचा भक्त निर्माण झाला तो म्हणजे गोपीनाथशास्त्री पाध्ये !
कालपरत्वे कलीयुगाच्या सरक्त्या पाऊलां गणिक समाजातून भक्तीचा हळू हळू लोप होऊ लागला होता आणि मानव पुन्हा षडरिपूंच्या विळख्यात सापडून, अंहकार , स्वार्थ ह्याच्या दलदलीत गंटागळ्या खाऊ लागला होता. मानवाचा हा अधोगतीकडे जाणारा प्रवास एक अन एक दिवस नक्कीच त्याला विनाशाच्या खोल गर्तेत , खाईत ढकलून देईल ह्या जाणीवेने ह्या भक्तश्रेष्ठाचा जीव कळवळला. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचा कळवळा दाटून आला. अनेक खडतर उपासना, तपे आणि व्रते करुन त्याने विठ्ठलास ‘हारी’ आणलेच व एकच मागणे मागितले, ‘‘तू आता बाळरुप घेऊन ये.’’ तसाच वर देऊन मग ‘तो’ पुतळेपण सोडून गोपीनाथशास्त्रींच्याच नातीच्या पोटी त्रिपुरारी पौर्णिमा १९५६ला सदगुरु रूपाने जन्म घेता झाला असे वाचनात आले.
ह्याचे हृद्य वर्णन हाचि नववा नववा आगळा |, सजीव बनला पंढरीचा पुतळा | ह्या आद्यपिपा म्हणून गौरविल्या जाणार्या श्री सुरेशचंद्र दत्तोपाध्ये ह्यांच्या अभंगात येतं. शृंखलाधर सद्गुरु श्री अनिरुद्धांवर प्रेम करणार्या प्रत्येकाला अत्यंत आवडणारं असं हे गुणवर्णनच आहे.
आपल्या भारतीय संस्कृतीत आपण सदगुरुंना ब्रम्हा, विष्णू , महेश म्हणून आळवितो - गुरुर्ब्र्म्हा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वर: गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नम: |
आपण खूपदा वाचतो की हा पंढरीचा विठू वारंवार आपल्या भक्तांसाठी उठून धावतच होता. संतांसाठी सर्व कामे करतच होता. एकनाथाघरी श्रीखंड्या बनून, सखु, जनाबाई ह्यांना त्यांच्या अगदी सर्व प्रकारच्या घरकामांत मदत करतच होता (जनाबाईसाठी गोवर्या वेचायला जाई, जात्यावर बसून दळण दळायला हातभार लावी इत्यादी) दामाजीसाठी तर हा डोईला मुंडासे बांधून ‘महार’ बनून गेला होता. आपल्या भक्तांवर लाभेवीण प्रेम करणारे सदगुरुही असेच त्यांच्या कल्याणासाठी सदैव धावतच असतात त्यांच्या पाठीमागे कधी अभयदाता अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थ बनून "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे " अशी ग्वाही देत तर कधी शिरडीनिवासी कृपासिंधु साईबाबा बनून ! तसेच पूर्ण जीवन मानवांसाठी, मानवासारखं, त्यांच्यात जन्म घेऊन, खेळून, शाळा-कॉलेज शिकून, व्यवसाय करुन....वगैरे वगैरे सगळं करण्यासाठी हा सावळा सदगुरुरूपाने जन्म घेता झाला त्रिपुरारी पौर्णिमा १९५६ साली- डॉ अनिरूध्द जोशी बनून !
आणि म्हणूनच असे वाटते की येणार्या सर्व काळासाठी आम्हा सर्व श्रद्धावानांचे हात व मस्तक, गोपीनाथशास्त्रींच्या चरणांशी जुळले पाहिजेत. त्यांच्या चरणांवर आम्हां श्रद्धावानांच्या डोळ्यांतून प्रेमाश्रूंचा, कृतज्ञतेचा अभिषेक सदैव व्हायला पाहिजे कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी की आज त्यांच्या पुण्याईने आम्हाला आज सदगुरु लाभला
१. ललिता सहस्त्रनाम ह्यांनीच विरचित करून श्री साईनाथांच्या चरणी अर्पिले असता त्यांना "श्री विद्यामकरंद " म्हणून साईनाथांनी स्वत: गौरविले होते.
२. "श्रीवर्धमान व्रताधिराज व्रत " हे आपल्याला ह्यांनीच त्यांच्या तपश्चर्येने प्राप्त करवून दिले ज्याची सविस्तर माहिती श्रीमद् पुरुषार्थ ग्रंथराज तृतीय खंड आनंदसाधना मध्ये आपण वाचू शकतो.
आजच्या दिवशी आपण त्यांचे स्मरण "ओम श्री विद्यामकरंद गोपीनाथाय नम: " हा मंत्र १०८ वेळा म्हणून करू शकतो.
हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
No comments:
Post a Comment