Wednesday, July 26, 2023

अधिकमासाचं महत्व

(अधिकमासाचं महत्व)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२३.०८.२०१२)

॥ हरि ॐ ॥

गेले दोन गुरुवार आपण भेटू शकलो नाही. का? हा प्रश्न अनेकांना पडला असेल . "का?" ह्या प्रश्नाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्यातूनच विज्ञान निर्माण झाले. "का?" ह्या प्रश्नातूनच अध्यात्म निर्माण झाले. "का?" हा प्रश्न जर पडला नाही तर मनुष्य प्रगतीच करू शकत नाही. पण हा "का?" प्रश्न कुठे व कधी विचारायचा हे अतिशय महत्त्वाचे असते.

आई लहान बाळाला सांगते. "भांडयाला हात लावू नको." इथे जर बाळाने "का?" प्रश्न विचारला आणि भांडयाला हात लावला तर काय होईल? भांडे गरम असल्याने हात भाजेल. जर आई बाळाचे संगोपन करताना बाळाच्या प्रत्येक "का?" ह्या प्रश्नाचे उत्तर देत राहिली तर ती त्याला वाढवू शकेल "का?" नाही.

लहान मुलांनी पण शाळेत जायला लागल्यावर १+१=२ असेच का? असा प्रश्न विचारला, तर चालणार आहे का? ह्यामागचे गणितशास्त्र जरी शिक्षकांनी त्यांना समजावून सांगितले तरी ते ह्या लहान मुलास समजू शकणार "का?" नाही. जर एखाद्या मुलाने समजा प्रश्न केला की २ ला २ च का म्हणतात? तर त्यावर शिक्षक काय म्हणतील, "आम्ही असेच म्हणतो तुला पाहिजे तसे तू म्हण." पण इथे आम्हांला कळलं पाहिजे की आम्ही एखादी गोष्ट ठरवल्याने त्यानुसार नियम बनतात का? नाही. शाळेत जर आम्ही प्रश्न केला की, शिक्षिका ही शिक्षिका का आहे? तर त्याचे उत्तर मिळेल तिच्याकडे शिकवण्याची degree आहे म्हणून. ह्यावर जर कोणी विचारले, "तिला degree कोणी दिली? तर काय सांगणार? ती शिक्षिका त्या विषयाच्या कॉलेजमधील शिक्षकांकडून शिकली म्हणून. ह्यावर जर विचारले, "त्या शिक्षकांना कुणी degree दिली? तर परत तेच उत्तर मिळणार. असं आपण सतत "का? का?" हा प्रश्न विचारत गेलो तरी तेच उत्तर मिळणार बरोबर मग हे अनादी अनंत आहे का? नाही. ह्याचा अर्थ सुरुवातीला ज्या कुणी ह्या शिक्षकांना degree दिली, त्यांच्याकडे ही degree नसली पाहिजे.

आमच्या मेडिकलमधले उदाहरण बघूया. आधी cardiology हे deparment नव्हते. पूर्वी जे कोणी MBBS शिकले होते, त्यांनी ह्या क्षेत्रात आधी अनुभव घेतला. मग ह्या विषयाचे वेगळे department सुरू करावे असे ठरले. त्या department मध्ये काम करण्यासाठी विद्यार्थी पाहिजे, म्हणून त्यासाठी विशेष अभ्यासक्रम आला. म्हणजेच जेव्हा पहिल्यांदा MD Cardiology ची परीक्षा घेतली गेली तेव्हा ही परीक्षा घेणार्‍याकडे ही degree नव्हती तर ते ह्या विषयातील अनुभवी होते.

इथे आपल्या लक्षात येईल की, "का?" हा प्रश्न विचारण्यामागे योग्य संतुलन असायला हवे. ह्यासाठी मोठी विद्वत्ता नको. सोपे उदाहरण बघूया. रोजच्या जीवनात आपल्याला भूक लागते. मग ती भूक "का?" लागते, हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी शरीररचनेचा अभ्यास केला. पण समजा आम्ही १० वर्षे रोज दुपारी १.०० वाजताच व रात्री १०.०० वाजताच जेवायचे ठरवले आणि त्याप्रमाणे वागलो तरी ११ व्या वर्षी आम्हांला त्याच वेळेला भूक लागते का? नाही.

नेहमी सूर्योदय होतो, पण तो बघण्यासाठी आम्हांला सूर्यावर जावे लागते का? नाही. पृथ्वीवरून आम्ही सूर्याची वेळ ठरवत असतो बरोबर. जर आम्ही इथे प्रश्न केला, ही सूर्याची वेळ बदलता नाही का येणार? तर ह्याचे उत्तर काय मिळेल, "असे केले तर पृथ्वीचा axis बदलेल. मग problem होईल. ह्यावर कोणी जर विचारले, प्रयत्न करुन नाही "का" बघता येणार? ह्याचे उत्तर शास्त्रज्ञ देऊ शकतील मी (परमपूज्य बापू) काही शास्त्रज्ञ नाही.

पावसाळ्यात आम्हांला नेहमी वाटते पाऊस रात्री १२.०० ते सकाळी ६.०० पर्यंतच पडावा व आवश्यक तेवढे पाणी मिळावे. दिवसा पाऊस पडू नये. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींवर आम्ही विचार करत असतो. पण जे आमच्या आवाक्यात नाही अशा गोष्टींवर आम्ही विचार का करावा? जे विचार करण्याची तुमची capacity नाही अशा गोष्टींवर तुम्ही "का" विचार करता मला (परमपूज्य बापू)कळत नाही.

समजा आई-वडील रस्त्यातून जात आहेत आणि त्यांनी एखाद्या तरुण मुलाचा accident बघितला, तर ते काय करतात घरी येऊन मुलाला बाईक नीट चालवली पाहिजे, त्यावर उपदेशाचे डोस देतात पण तेव्हाच हाही विचार येतो, "एवढा लहान मुलगा "का" गेला? काय प्रारब्ध असेल त्याचे?

रस्त्यात भिकारी बघून मनात प्रश्न येतो- "हा भीक "का" मागतो? शेजारच्या व्यक्तीने त्याच्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले असे कळल्यावर "का?" ठेवले असेल असा प्रश्न मनात येतो. मला सांगा काय करणार तुम्ही? असा विचार करून, तुम्ही त्याच्या आई-वडिलांना जास्तीत जास्त काय करणार? त्याचेच अनुकरण करून तुमच्याही आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवाल बरोबर.

एक मनुष्य Mr.X आहे ह्याच्या घरी येतोय आणि त्याला त्याच्या घराला आग लागलेली दिसतेय मग त्याने काय करायला हवे? आग "का" लागली? ह्याचे संशोधन करत बसायला पाहिजे का? नाही. त्याने तेव्हा पाणी ओतून आग विझवायला हवी.

म्हणजेच आम्हांला "का?" ह्या प्रश्नाला मर्यादा घालता आली पाहिजे. आमच्या जीवनात "का" ह्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. कारण आम्ही "का?" प्रश्नाला मर्यादा घालत नाही. सतत का? का? ही काव काव आमच्या मनात चालू असते. कावळ्यांना श्राद्ध घालण्यापेक्षा ह्या मनातल्या काव काव करणार्‍या कावळ्यांना श्राद्ध घाला. म्हणजे काय? तर सतत का? का? न म्हणत बसता, कामाला लागायचे.

समजा तुम्ही तरुण आहात आणि एक अतिशय सुंदर मुलगी जवळून चालली आहे. तर ही मुलगी इथे का? असा प्रश्न कोणी विचारून त्यावर संशोधन करत बसला तर काय होईल? त्याला मग त्या मुलीची लग्नाची वरात बघायची पाळी येईल. हेच जर का? प्रश्न न करता तिची व तिच्या आई-वडिलांची माहिती काढली, योग्य विचारणा केली तर त्या तुमच्या आवडत्या मुलीशी तुमचे लग्न जुळेल. ह्यावरून लक्षात येते की, "का?" ह्याचे प्रमाण प्रत्येक माणसासाठी प्रत्येक क्षणाला वेगळे आहे. कुठल्या "का?" ची सोबत धरायची व कुठल्या "का?" ला बाजूला सारायचे हे महत्त्वाचे आहे. प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक क्षण हा कुठल्या ना कुठल्या "का?" सोबत निगडित असतो. कारण मनुष्याला नेहमी पडणारा प्रश्न म्हणजे "मी ह्या मृत्युलोकात "का?" आलो. कोणी विचारत का - "मी "का" मेलेलो नाही?" "देवा मी "का" जिवंत आहे?" जोपर्यंत तुम्ही ह्या मृत्युलोकात आहात तोपर्यंत हा "का?" प्रश्न तुमची साथ सोडत नाही

आपण जन्माला येतो त्याला आपण मृत्युलोक म्हणतो आणि ह्या मृत्युलोकातून बाहेर पडण्याला मृत्यू म्हणतो. पण एक कायम लक्षात ठेवा, श्रद्धावानासाठी नेहमी जन्म म्हणजे परमात्म्याच्या जगातून मृत्युलोकात जन्म असतो व मृत्यू म्हणजे त्याचा परमात्म्याच्या जगात जन्म असतो. त्यामुळे मृत्यूचे भय ठेवण्याची आवश्यकताच नाही. सोप्या भाषेत समजून घेऊया समजा माझी दोन घरे आहेत. एक मद्रासमध्ये आहे तर एक मुंबईत आहे. मी जेव्हा मद्रासमध्ये असणार तेव्हा मुंबईत नसणार बरोबर पण दोन्ही घरे ही भारतातच आहेत. त्याचप्रमाणे परमात्म लोक व मृत्युलोकाचे असते. म्हणजे मी कुठेही असलो तरी आई चण्डिकेच्या भर्गलोकातच असतो.

"सच्च्या श्रद्धावानाला मृत्यू नसतो, तो एक तर मृत्युलोकात जन्म घेतो नाही तर परमात्मा लोकात जन्म घेतो."

प्रत्येक श्रद्धावानाने नीट लक्षात घेतले पाहिजे की त्याला मृत्यू नाही. जो कोणी म्हणून "तो" आहे, त्याला आपले मानून त्याच्यावर विश्वास ठेवतो, श्रद्धावानाच्या नऊ निष्ठा आत्मसात करण्याचा प्रयास करतो, ह्या अनिरुद्धाला आपला मित्र मानतो त्याला मृत्यूचे भय नाही. अशा श्रद्धावानाच्या प्रत्येक जन्माच्या वेळेस "तो" जो कोणी आहे "तो" त्या श्रद्धावानाच्या हाताला धरून मृत्युलोकात पृथ्वीच्या शाळेत घेऊन येईल. आई जशी बाळाला हात धरून घरून शाळेत आणते व परत घरी घेऊन जाते. तसेच श्रद्धावानाच्या हाताला धरून पृथ्वीच्या शाळेत आणणारा तोच व परत पृथ्वीच्या शाळेतून आपल्या घरी परमात्म लोकात नेणाराही तोच. इथे सोबत ना पाटी ना पेन्सिल. इथे पाटी म्हणजे आमचे प्रारब्ध, नशीब. तो पृथ्वीवर श्रद्धावानाला घेऊन येतो ते त्याची पाटी कोरी करण्यासाठी, जे काही त्यावर लिहिले आहे, ते पुसून स्वच्छ करण्यासाठी.
असे जे कोणी श्रद्धावान त्याच्या मार्गावरुन चालण्याचा थोडासा जरी प्रयास करत असतील अशा सर्वांना "तो" जेव्हा येतो तेव्हा त्यांना स्वत:कडे खेचून घेतो. बाकिच्यांना नाही. शाळेत आल्यावर शिकावेच लागते, अभ्यास करावा लागतो, मारही खावा लागतो, पण हे सगळे करण्यासाठी आमचे भले व्हावे म्हणूनच -

"काय गोड गुरुची शाळा"

गेल्या आठवड्यात अधिक मास सुरू झाला. ह्या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. ह्या अधिक मासात नेहमी अधिक गोष्ट करायची असते. ह्या अधिक महिन्यात एकदा तरी त्या आदिमातेसमोर व तिच्या पुत्रासमोर उभे राहून बोला, "मी कधीच मरणार नाही. मला दोन्हीकडे जन्मच आहे."

मी(परमपूज्य बापू) जो कोणी आहे, राक्षस म्हणा, शत्रू म्हणा, मित्र म्हणा, काहीही म्हणा, जो कोणी "माझा" झाला त्याची पाटी कोरी करण्यासाठी मी आलो आहे. ह्या जन्मात जो कोणी माझा (परमपूज्य बापू) झाला व माझा बनून राहिला त्याची सगळी पापे मी वरतीच धुऊन टाकणार आहे. त्यामुळे मनापासून एकदा तरी ह्या अधिक मासात त्या आदिमातेसमोर व तिच्या पुत्रांसमोर उभे राहून म्हणा, कुठल्याही भाषेत म्हणा. जो कोणी माझा होऊन माझ्यावर विश्वास ठेवून हे वाक्य बोलणार असेल तर त्याचे चुकीचे शब्द सुधारण्याची जबाबदारी माझी.

आज मला इथे प्रत्येकाला माहिती पाहिजे की, "मी जो कोणी आहे तो कधीच मरणार नाही आणि प्रत्येक वेळी ह्यापुढे जन्म घेताना आमच्यासोबत पापाचा अंश बिलकुल नसणार. म्हणजे ह्यापुढे आम्ही फक्त सुख भोगण्यासाठीच येणार. तुम्ही(परमपूज्य बापू) सुरू केलेलं व्रत पूर्ण होण्याआधीच एवढी gurantee कशी काय देता बापू? परत "का"? आला.

तर एवढेच सांगतो, की हे तुमचे क्षेत्र नाही. पृथ्वी उत्पत्तीपासून जर आतापर्यंतचे सगळे मानव जरी एकत्र आले व सगळ्यांनी हातात मोठ-मोठी शस्त्रे, मिसाईल्स घेतली आणि माझ्या हातात काहीच नाही, कुठलेही शस्त्र नाही, तरी माझे challenge आहे. अशा अख्ख्या संघाने समोर येऊन दाखवावे. हवं तर येताना भूतांना, पिशाश्चांना, राक्षसांना घेऊन या, तरीदेखील एकच सांगतो - "मी(परमपूज्य बापू) लई भारी आहे". मी (परमपूज्य बापू) आज पहिल्याच गुरुवारी अधिक मासात व्रत सुरू केले आणि त्याचक्षणी माझ्या(परमपूज्य बापू) आईने त्याचे उद्यापन पण करून घेतले व आशीर्वादही दिला आहे. कारण फक्त तिचे प्रेम.

ह्या प्रवचनाची CD Centre ला पण येईल. तुम्ही तुमच्या नातलगांना आतासुद्धा सांगू शकता. प्रत्येक व्यक्तीला (श्रध्दावानाला) ज्या क्षणी ही माहिती मिळेल. त्या व्यक्तीसाठी आताचा क्षण हा त्या क्षणापासून सुरू होईल. आपण नेहमी गुरुक्षेत्रम मंत्र इथे घेतो. पण आज आपण माझ्या आईचा गजर करायचा आहे. सगळ्यांनी मिळून उभे राहून आज जल्लोष करायचा आहे.

आज जे काही तिने माझ्या (परमपूज्य बापू) मित्रांना दिले आहे, त्याचा आनंद मला जोरदारपणे साजरा करायचा आहे.

॥ हरि ॐ ॥

No comments:

Post a Comment