तुलसीपत्र १६१६
कलियुगात भक्तीभाव चैतन्यात राहाण्याची, मंत्रगजर करण्याची गरज का आहे?
भरत - शुभदा संवाद
भरत - हे भक्तिरसमयी शुभदे!
हा स्वयंभगवान आकाशरुपाने सर्वत्र आणि सदैव व्यापून राहिलेला असतो.
सत्ययुगात या स्वयंभगवानाच्या ह्या आकाश रुपातून अर्थात आकाशातूनच प्रत्येक श्रद्धावानाला सहजतेने ऊर्जा व सहाय्य मिळविता येते.
त्रेतायुगात पवित्र यज्ञातून निघणा-या धुरातून ह्या यज्ञ स्वरुप स्वयंभगवानाचे सहाय्य श्रद्धावानांना सहजतेने मिळू लागते.
द्वापायुगात ह्या स्वयंभगवानाच्या पूजनातून अर्थात स्वयंभगवानाच्या विविध रुपांच्या प्राणप्रतिष्ठित मूर्तींपासून हेच सहाय्य श्रद्धावानांना मिळविता येते.
परंतु कलियुगामध्ये एका बाजूला भक्ती करण्याचा वेळ कमी कमी होत जातो, भक्तीची गोडीही कमी होत जाते, मंदिराचे पावित्र्य देखील सामान्यजन व मंदिरसेवकही व्यवस्थित पाळू शकत नाहीत, अन्न व नैवेद्यही तेवढेसे शुद्ध नसतात, मंदिराच्या आजूबाजूला फक्त नफा कमावणा-यांचेच अस्तित्व वाढू लागते आणि दुस-या बाजूला तपश्चर्या, कठोर व्रते, ध्यान धारणा, पवित्र आचरण, समर्पण बुद्धी या घटकांचा लोप होत जातो व त्याचबरोबर अनैतिकता, पापे, दुराचार वाढू लागतात.
ह्यामुळे साध्यासुध्या मनुष्याला स्वयंभगवानापासून सहाय्य मिळविण्याचे सर्व मार्ग वापरता येत नाहीत व हे नीट जाणणारा स्वयंभगवान आपल्या अपत्यांवरील प्रेमामुळे धुलिकणपुरुष व स्त्रिया उत्पन्न करीत राहतो.
हे सर्व धुलिकणपुरुष व स्त्रिया भक्ती करु पाहाणा-या मानवांच्या त्रिविध देहांमध्ये स्वयंभगवानाचे सहाय्य स्वतः आणून थेट ओतत राहतात. श्रद्धावानाला काही करावेच लागत नाही.
सहाय्य करणा-या या धुलिकणपुरुषांना श्रद्धावानाच्या त्रिविध देहांत सहाय्य ओतण्यासाठी कुठल्याच गोष्टीची आवश्यकता नसते.
परंतु या सहाय्याचा उपयोग करून घेण्यासाठी श्रद्धावानाला मात्र भक्तीभाव चैतन्यात राहण्याची आवश्यकता असते.
जो जो श्रद्धावान भक्तीभाव चैतन्यात राहतो, त्याच्या त्रिविध देहांत स्वयंभगवानाच्या सर्व प्रकारच्या ऊर्जा, ह्या अशा धुलिकणपुरुषांच्या माध्यमातून विविध कार्ये करु लागतात.
पृथ्वीवरील प्रत्येक धुलिकणाला सुद्धा हा स्वयंभगवान आपला दूत बनवू शकतो अर्थात धुलिकणपुरुष बनवू शकतो - केवळ त्याच्या चरणस्पर्शाने.
स्वयंभगवानाचे चरण धरणे, त्यांच्यावर आपले मस्तक टेकविणे, त्याच्या चरणांवर स्वत:ला समर्पित करणे, त्या चरणांची सेवा करणे आणि त्या चरणांना आपल्या हृदयात बसविणे हेच सर्व श्रद्धावानांसाठी सर्वश्रेष्ठ आहे.
या स्वयंभगवानाचे चरण आपण प्रेमाने पकडले तर आपल्या ह्या भौतिक स्थूल शरीरात सुद्धा आपोआपच असंख्य धूलिकणपुरुष तयार होतील.
ही स्वयंभगवानाचीच योजना आहे त्याच्यावर निस्सीम प्रेम करणा-या श्रद्धावानांसाठी.
श्रद्धावानाला, हा स्वयंभगवान कधी आपल्यासाठी, आपल्याला सहाय्य करण्यासाठी असे तेजस्वी धूलिकणपुरुष उत्पन्न करील ह्याची वाट पाहण्याची गरज उरणार नाही. आपणच जर त्याचे चरण पकडले की मग वाट पाहणे थांबते.
भरत - श्रद्धावानहो! तो स्वयंभगवान कधी तुमच्या जीवनात पाय ठेवील याची वाट पाहत बसू नका, उठा! आणि त्याचे चरण आपल्या मस्तकावर, हातात आणि प्रेमाने हृदयात धारण करा. त्याचे कार्य तो करतच असतो आपण आपले कार्य करुया.
आणि आपले प्रमुख कार्य आहे त्याच्या दोन चरणांत राहण्याचे.
आणि त्याच्या दोन चरणांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भक्तीभाव चैतन्य.
आणि त्याच्या भक्तीभाव चैतन्यात राहाण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे मंत्रगजर.
रामनाम, रामकथा हे भक्तीभाव चैतन्याचे महाद्वार आहे.
अंबज्ञ
(Whtsapp group)
No comments:
Post a Comment