जो सद्गुरुवर विश्वास ठेवतो ...तो उपभोगतोअष्टैश्वर्य
" गाणगापुरात एक ब्राह्मण होता. तो फार गरीब होता. गावात शंभर एक घरे होती. वैदिक ब्राह्मणाचा गाव अशी गाणगापुराची प्रसिद्धी होती. श्रीगुरु नृसिंहसरस्वती अमरजासंगमावर राहत असताना , दुपारी गाणगापुरात भिक्षा मागावयाला जात असत. त्या गरीब ब्राह्मणाच्या घरी श्रीगुरूकृपेने एक दिवस एक चमत्कार घडला. त्या ब्राह्मणाची एक म्हैस होती. ती वांझ असली तरी वेसण घालून , माती वाहून नेण्याकरिता तिला भाड्याने तो ब्राह्मण देत असे. बरीच वर्षे त्या म्हशीने त्या दरिद्री ब्राह्मणाला दूध दिले नाही , पण श्रमाचा थोडाफार पैसा मिळवून दिला. आता मात्र ती म्हातारी झाली होती. तोंडात दातांचा पत्ता नव्हता. एक दिवस श्रीगुरुनाथयती त्या दरिद्री ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. ते पाहून बाजूचे सर्व शिष्ट ब्राह्मण आपापसात कुजबुजू लागले ,
" काय विचित्र आहे हा यती. आमच्या घरी भिक्षेला आला असता तर त्याला आम्ही पंचपक्कांन्ने वाढली असती , पण हा गेला या दारिद्र्याचे घरी. पाहू याची काय गंमत होते ती. "
त्या गर्विष्ठ ब्राह्मणांना प्रभुची लीला काय माहीत ! विदुराच्या घरी प्रेमाने कण्या खाणारा भगवान दुर्योधनाच्या राजवाड्यांत कधी गेला नाही. ज्यांची सात्त्विक वृत्ती त्यांच्यावर श्रीगुरूंची प्रीती. श्रीगुरुंनी भिक्षा मागावयाला जायला व त्याच दिवशी त्या गरीब ब्राह्मणाची म्हैस कोणी भाड्याने न नेण्याला एकच गाठ पडली होती. वैशाख महिन्याचा कडक उन्हाळा. त्यातच भर दुपारची वेळ. तो ब्राह्मण भिक्षा मागायला गावात गेलेला. घरांत त्याची पत्नी चिंतामग्न बसलेली. एवढ्यात ' ॐ भवति भिक्षां देहि , " असा सूर तिच्या कानी आला. ती धावतच बाहेर गेली. तिने श्रीगुरुंना पाहताच त्या॑ना भक्तिपूर्वक नमस्कार केला व म्हणाली ,
" गुरुराया , माझे पती भिक्षा मागून आणायला गावात गेले आहेत. ते लवकरच परत येतील. त्या॑ना चांगले अन्न भिक्षेत मिळाले असेल. तोपर्यंत आपण या आसनावर बसावे. घरात आपणाला द्यावयाला दुसरे काही नाही. "
आसनावर बसून श्रीगुरू म्हणाले ,
" काय ग बाई , मला तू दूधाचीच भिक्षा का वाढीत नाहीस ? तुझ्या दारांत ही म्हैस तर बांधलेली आहे. मग दूध वाढता येण्यासारखे असताना काहीच द्यायला नाही असे खोटे का सांगितलेस ? "
" यतीमहाराज , आमची ही म्हैस वांझ आहे. रेडा म्हणून तिला आम्ही पोसतो. कधी कधी माती वाहून नेण्याकरिता गावातले लोक नेतात तिला. आमच्या योगक्षेमाला थोडाफार हातभार लावीत म्हातारी झाली बिचारी आतां. "
" बाई , ही म्हैस वांझ आहे असे खोटे का सांगता ? जा लवकर व दुध काढावयाला बसा. मला दुधाची भिक्षाही चालेल. "
" ठीक आहे यतिमहाराज. आपण सांगता आहात , तर जातेच मी दुध काढायला. "
ती ब्राह्मणाची विनम्र पत्नी श्रीगुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून , खरोखरच , म्हशीचे दूध काढावयाला बसली व म्हशीला पान्हा सुटून तिने दूध दिले. दुधाचे भांडे पूर्ण भरले. ते आश्चर्य पाहून , ते भिक्षा मागायला आलेले यतीराज साधेसुधे नसून ईश्वरी अवतार असावेत , याबद्दल त्या बाईची खात्री पटली. झटपट स्वयंपाकघरात जाऊन तिने दूध तापविले व यतीच्या सांगण्याप्रमाणे ती दुग्धभिक्षा त्यांना वाढायला घेऊन आली. श्रीगुरुंनी दुग्धप्राशन केले.
" तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल , पुत्रपौत्रांचे सुख तुम्ही अनुभवाल. मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. " असा आशीर्वाद देऊन श्रीगुरू संगमाकडे निघून गेले. थोड्या वेळाने ब्राह्मण कोरान्न मागून घरी परतला. वांझ म्हशीने दूध दिल्याचे ऐकून तो आश्चर्यचकित झाला. आरती घेऊन पतिपत्नी संगमावर गेली व त्यांनी भक्तिपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली. अरे नामधारका , ज्यांच्यावर श्रीगुरूंची कृपा होते त्याला दैन्य बाधत नाही. तो अष्टैश्वर्य भोगतो.
Saturday, January 5, 2019
Story: Gangapur
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment