Sunday, September 5, 2021

panchamukh hanuman kavach

 whatsapp post

हरि ॐ नाथसंविध्

बापूंनी पितृवचनातून किंवा अग्रलेखातून दिलेली एखादी माहिती कित्येकांना माहित असेलही पण कित्येकांना माहित नसेलही. ज्यांना माहित नसेल त्यांनी ती नक्कीच अभ्यासू वृत्तीने वाचावी.

मंगळवारच्या उपासनेत आपण श्रीपंचमुखहनुमत्कवच म्हणतो.

बापूंनी अर्थासहित सांगितलेलं श्रीपंचमुखहनुमत्कवच. 

एकदा गरुडाला खूप गर्व झाला होता की अमृताचा कुंभ मी आणलाय. महाविष्णू गरुडावर स्वार होऊन फिरायला निघतात. गरुड उडायला सुरुवात करतो पण उडूच शकत नाही. खूप प्रयत्न केले. शेवटी महाविष्णूची प्रार्थना केली. देवा आज असं का झालं?
महाविष्णू म्हणाले, उड.
आणि गरुड उडायला लागला. त्याला वाटलं, महाविष्णू माझी प्रत्येक गोष्ट मानतात.  परत तो खाली यायला लागला आणि उडणं बंद झालं. तेव्हा त्याने महाविष्णूची प्रार्थना केली की देवा माझ्याजवळ जी घमेंड आहे ती कशी काढू?
महाविष्णू म्हणाले, हे मी नाही करु शकत. त्यासाठी तुला त्रिविक्रमाबरोबर जावे लागेल.
त्रिविक्रम म्हणाला, मी तुझी घमेंड जरुर काढेन पण मला तुझ्याकडून काहीतरी पाहिजे. मला दक्षिणा पाहिजे.
गरुड म्हणाला, काय दक्षिणा आहे?
तेव्हा त्रिविक्रम म्हणाला, पंचमुख हनुमान मेरु पर्वतावर सदैव ध्यान करत बसतात. त्यांचं ध्यान बघून ये आणि त्यांच वर्णन मला सांग.
तेव्हा गरुड जातो आणि सर्व बघून परत येतो आणि त्रिविक्रमाशी संवाद होतो. या संवादात हे हनुमत्कवच येतं.

*अथ ध्यानं प्रवक्ष्यामि शृणु सर्वांगसुंदर*

सर्वांगसुंदर हे त्रिविक्रमाच नांव आहे. त्रिविक्रम बाल स्वरुपात बसलाय आणि गरुड त्यांना सांगतोय.

*पंचवक्त्रं महाभीमं त्रिपंचनयनैर्युतम्! बाहुभिर्दशभिर्युक्तं सर्वकामार्थसिद्धिदम्!*

पाच मुखांसह प्रचंड विशाल असणारा, पंधरा नयन असणारा.
आणि सर्व प्रकारचे पुरुषार्थ सिद्ध करणारा.

हनुमंताला आदिमाता चण्डिका प्रमाणे तीन डोळे आहेत जसे शिवाला तीन नयन आहेत. म्हणून त्याला महारुद्र म्हणतात.
तिस-या नयनाची जागा आज्ञाचक्राच्या ठिकाणी असते.

*पूर्व तू वानरं वक्त्रं कोटिसूर्यसमप्रभम् !* *दंष्ट्राकरालवदनं भ्रुकुटीकुटिलेक्षणम् !!*

याचं पूर्वदिशेचं जे मुख आहे ते वानरमुख आहे. त्याची प्रभा म्हणजे तेज कोटी सूर्यांइतकी आहे. त्यांचं हे मुख कराल म्हणजे भयकारक आहे. भ्रुकुटी म्हणजे भुवई आणि कुटिल म्हणजे वाकडी. भुवई वाकडी करुन बघणारे हे मुख आहे.

*अस्यैव दक्षिणं वक्त्रं नारसिंह महाद्भुतम् !*
*अत्युग्रतेजोवपुषं भीषणं भयनाशनम् !!*

वक्त्र म्हणजे चेहरा, मुख. याचं दक्षिण दिशेला जे मुख आहे ते नारसिंहमुख आहे आणि अत्यंत अद्भुत असं आहे. अत्यंत उग्र असं तेज असलेलं वपु (वपु म्हणजे शरीर) ज्याचं आहे असा हा हनुमंत, त्याचे हे मुख भय उत्पन्न करणारे (वाईट माणसांसाठी) आणि भय नष्ट करणारे (भक्तांसाठी) आहे.

*पश्चिमं गारुडं वक्त्रं वक्रतुण्डं महाबलम् !*
*सर्वनागप्रशमनं विषभूतादिकृन्तनम् !!*

पश्चिम दिशेला बघणारे जे मुख आहे ते गरुडमुख वक्रतुण्डं आहे त्याचप्रमाणे ते महाबल म्हणजे अत्यंत सामर्थ्यवान आहे, सर्व नागांचे प्रशमन करणारे, विष आणि भूत यांच कृंतन करणारे (नायनाट करणारे) गरुडानन आहे.

*उत्तरं सौकरं वक्त्रं कृष्णं दीप्तं नभोपमम् !*
*पातालसिंहवेतालज्वररोगादि कृन्तनम् !!*

उत्तर दिशेला पाहणारे मुख हे वराहमुख आहे. ते कृष्ण म्हणजे काळ्या रंगाचे आहे, तेजस्वी आहे. पाताळात राहणा-यांचा प्रमुख वेताळ आणि भूलोकी त्रास देणा-या व्याधिंचा प्रमुख ज्वर यांना नष्ट करणारं असं हे वराहमुख आहे.

*ऊर्ध्वं हयाननं घोरं दानवान्तकरं परम् ! येन वक्त्रेण विप्रेन्द्र तारकाख्यं महासुरम् !!*
*जघान शरणं तत्स्यात्सर्वशत्रुहरं परम् !*
*ध्यात्वा पंचमुखं रुद्रं हनुमन्तं दयानिधिम् !!*

ऊर्ध्व दिशेला म्हणजे वर बघणारे जे मुख आहे ते अश्वमुख आहे. हय म्हणजे घोडा. हे दानवांचा नाश करणारे असे श्रेष्ठ मुख आहे.
हे विप्रेंद्रा (श्रेष्ठ गायत्री उपासना), तारकाख्य नावाच्या प्रचंड असुराला ज्याने नष्ट केले असं हे अश्वमुख आहे. सर्व शत्रुंचे हरण करणा-या अशा श्रेष्ठ पंचमुख हनुमंताच्या चरणी तू शरण रहा. रुद्र आणि दयानिधी अशा दोन्ही रुपांतर असणा-या हनुमंताचं ध्यान करावं.

*खड्गं त्रिशूलं खट्वांगं पाशमंकुशपर्वतम् ! मुष्टिं कौमौदकीं वृक्षं धारयंतं कमण्डलुम् !!*
*भिन्दिपालं ज्ञानमुद्रां दशभिर्मुनिपुंगवम् !*
*एतान्यायुधजालानि धारयन्तं भजाम्यहम् !!*

हनुमंताच्या हातामध्ये तलवार, त्रिशुल, खट्वांग, पाश, अंकुश, पर्वत आहे. त्याचप्रमाणे मुष्टी नावाचं आयुध, कौमोदकी गदा (हनुमंताच्या गदेचे नांव कौमोदकी आहे), एका हातात वृक्ष धारण केलेला आहे. तसेच एका हातात कमंडलु आहे. हनुमंताने भिंदिपाल धारण केलं आहे. भिंदिपाल हे लोहाने बनविलेले विलक्षण अस्त्र आहे. हे फेकून मारलं जातं तसेच यातून बाणही मारता येतात. दहावं आयुध आहे ज्ञानमुद्रा. अशा या मुनिपुंगव (मुनिश्रेष्ठ) पंचमुख हनुमंताची मी (गरुड) स्वत: भक्ती करतो.

*प्रेतासनोपविष्टं तं सर्वाभरणभूषितम् !*
*दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् !!*

उपविष्ट म्हणजे बसलेला. हा प्रेतासनावर बसलेला आहे. हा सर्व आभरणांनी भूषित आहे. (आभारण म्हणजे अलंकार, दागिने). दिव्य माला आणि दिव्य वस्त्र त्याने धारण केले आहे तसेच दिव्य गंधाचा लेप अंगाला लावलेला आहे.

*सर्वाश्चर्यमयं देवं हनुमद्विश्वतो मुखम् ! पंचस्यमच्युतमनेकविचित्र वर्णवक्त्रं शशांकशिखरं कपिराजवर्यंम् !!*
*पीताम्बरादिमुकुटैरुपशोभितांगम्! पिंगाक्षमाद्यमनिशं मनसा स्मरामि !!*
सर्व आश्चर्यांनी भरलेला असा हा आमचा देव आहे. विश्वात सर्वत्र ज्याने मुख केले असा हा पंचमुख, अच्युत आणि अनेक अद्भुत वर्णमुखे असणारा आहे. शश म्हणजे ससा. अशा या सशाला अंकावर म्हणजेच मांडीवर धारण करणारा शशांक म्हणजे चंद्र आणि अशा चंद्राला ज्याने माथ्यावर धारण केला आहे असा तो हनुमंत आहे. कपिंमध्ये सर्वात श्रेष्ठ असा हा आहे. पीतांबर, मुकुट अशा गोष्टींनी सुशोभित ज्याचे अंग आहे असा हा आहे. गुलाबी आभायुक्त पीत वर्णाचे डोळे असलेला, आद्य म्हणजे पहिला, अनिश म्हणजे शाश्वत आहे. अशा या हनुमंताचे आम्ही मन:पूर्वक स्मरण करतो.

*मर्कटेशं महोत्साहं सर्वशत्रुहरं परम् ! शत्रु संहर मां रक्ष श्रीमन्नापदमुद्धर !!*

वानरश्रेष्ठ असा हा प्रचंड उत्साही हनुमंत सर्व शत्रुंचा नि:पात करणारा आहे. हे पंचमुख हनुमंता, माझ्या शत्रुंचा संहार कर,  माझं रक्षण कर. संकटामधून माझा उद्धार कर.

*ॐ हरिमर्कट मर्कट मन्त्रमिदं परिलिख्यति लिख्यति वामतले ! यदि नश्यति नश्यति शत्रुकुलं‌ यदि मुन्चति मुन्चति वामलता !!*
*ॐ हरिमर्कटाय स्वाहा !*

महाप्राण हनुमंताच्या डाव्या पायाच्या तळव्याखाली *ॐ हरिमर्कटाय स्वाहा* हे जो लिहिल, त्याच्या फक्त शत्रुचाच नाही तर शत्रुकुळाचाही नाश होईल.  वाईट मार्गावर जाण्याची वृत्ती म्हणजे वामलता. या वामलतेला म्हणजे या वृत्तीला हनुमंत समूळ नष्ट करुन टाकतो.

आता प्रत्येक वदनाला स्वाहा म्हणून नमस्कार केला आहे.

*ॐ नमो भगवते पंचवदनाय पूर्वकपिमुखाय सकलशत्रुसंहारकाय स्वाहा !*

सर्व शत्रुंचा संहार करणा-या पूर्वकपिमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.

*ॐ नमो भगवते पंचवदनाय दक्षिणमुखाय करालवदनय नरसिंहाय सकलभूतप्रमथनाय  स्वाहा !*

दुष्प्रवृत्तींसाठी भयंकर मुख असणा-या, सर्व भूतांचा उच्छेद करणा-या  दक्षिणमुखास, नरसिंहमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.

*ॐ नमो भगवते पंचवदनाय पश्चिममुखाय गरुडाननाय*
*सकलविषहराय  स्वाहा !*

सर्व विषांचे हरण करणा-या  पश्चिममुखास, गरुडमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.

*ॐ नमो भगवते पंचवदनाय उत्तरमुखाय आदिवराहाय सकलसंपत्कराय स्वाहा !*

सर्व संपदा देणा-या उत्तरमुखास, आदिवराहमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.

*ॐ नमो भगवते पंचवदनाय उर्ध्वमुखाय हयग्रीवाय सकलजनवशकराय स्वाहा !*

सर्व जनांना वश करणा-या उर्ध्वमुखास, अश्वमुखास, भगवान श्रीपंचमुख हनुमंतास नमस्कार असो.

शिरीषसिंह दिघे, कर्जत

अंबज्ञ

No comments:

Post a Comment